Samachar Live
कलासंस्कृती

महाराष्ट्र दिन – शिल्पकार महाराष्ट्र निर्मितिचे

maharashtra day

१ मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. याच दिवशी १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने स्वःइच्छेने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्र दिन धार्मिक सुधारणांचा आणि सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.

महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र दिन म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली गेली होती. महान कवयित्री महादेवी वर्मां ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या यांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, देशप्रेमाची त्यागाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे मनापासून पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, गोपाळ कृष्ण गोखले, उमाजी नाईक, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.

संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वार, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. माजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले. 

देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, लेखक, बुध्दीवादी, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेशएकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.

महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. त्यात सर्वांत महत्त्वाचे गुणवर्णन म्हणजेच राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥॥ अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनीही बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा अशा शब्दांत स्वाभिमान जागवला आहे. 

महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक आणि विज्ञान ई. अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धारआपण करावयास हवा. 

Must Read

चैत्र नवरात्री साजरी करण्यामागील महत्त्व

किरण परब

होळी रंगाचा आणि उत्साहाचा सण

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More