Samachar Live
जीवनशैली

महाबळेश्वर सारखी अजून काही थंड हवेची ठिकाणे

summer 4

उन्हाळा! वाढलेल्या तापमानाबरोबरच उन्हाळ्याची सुट्टीही घेउन येणारा ऋतु. तरी उन्हाळ्याच्या ट्रिपचं प्लॅनिंग आधीच केलं जात. उन्हाळ्याच्या काळ असल्याने सहसा थंड हवेच्या ठिकाणांना भेटी दिल्या जातात. नेहमीच लोक मुंबई गोवा मनाली महाबळेश्वर चिखलदरा इत्यादी नेहमीच्या ठिकाणांवर भेटी देतात. पण तुम्ही जर या ठिकाणांवर जाऊन कंटाळले असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास पर्याय घेऊन आलो आहोत.

महाबळेश्वर :

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले आहे. तसेच कृष्णा, वेण्णा, कोयना सावित्री, व गायत्री या पाच नद्या येथून उगम पावतात. या स्थानाला पंचगंगा असेही म्हटले जाते. जुन्या मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणून महाबळेश्वरला संबोधले जात होते. येथील सुंदर बगीचे, उदयाने, हिरवा निसर्ग, श्वास रोखायला लावणारी दृश्ये इत्यादीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात. ब्रिटीश-कालीन वैभवसंपन्न आणि मनमोहक वाडे, इमारती या आजही त्यावेळच्या ब्रिटीश राजवटीची ओळख करून देतात.

महाबळेश्वर पाहताना ऑर्थर सीट, बॉम्बे पॉइंट, केटस् पॉईंट, लॉडविक – विल्सन, एलफिस्टन पॉईंट्स, वेण्णा लेक, लिंगमळा धबधबा, तापोळा, जवळचे श्रीक्षेत्र महाबळेश्वर, येथील महादेवाचे मंदिर ही ठिकाणे महत्त्वाची आहेत असे म्हटले जाते.

पाचगणी :

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात (महाबळेश्र्वरपासून केवळ २० कि. मी. अंतरावर) सर्वात उंच व सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. महाराष्ट्रातील नैसर्गिक परिसर आणि हवामाना मुळे हे महाराष्ट्रातील आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे १३३४ मीटर उंच असून येथे अनेक ठिकाणे आहेत. पंचगणी हिल स्टेशनवरील पॅराग्लाइडिंग (पैराग्लाइडिंग) देखील खूप प्रसिद्ध आहे. पाचगणी आणि महाबळेश्र्वर ही दोन्ही स्थल अनेक प्रेक्षणीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. दाट झाडी, डोंगरकडे, चिंचोळे मार्ग, पर्यटनाचे ठिकाण म्हणून मुद्दाम तयार केलेले उत्तर रस्ते हे पाचगणीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. केशरी गाजरे, स्ट्रॉबेरी, तुती, मध, या सोबतच जॅम – जेली, सरबते तयार करणार्‍या कंपनीच्या उत्तम बागा हेदेखील पाचगणीचे आकर्षण आहे.

लोणावळा – खंडाळा :

पुणे जिल्ह्यात विविध प्रेक्षणीय ठिकाणे तसेच ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे आहेत. लोणावळा – खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर आहे. हे ठिकाण पावसाळ्यात धबधब्यांमुळे अधिकच आकर्षक वाटते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुणे व मुंबई या दोन महानगरांच्या मध्ये ही ठिकाणे आहेत. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत. पावसाळ्यात हौशी पर्यटक लोणावळा-खंडाळा भागात पावसात भिजत, चालत फिरतात. कार्ल्याची व भाजे येथील लेणी, एकवीरा देवीचे स्थान, राजमाची व लोहगड किल्ले ही ठिकाणेही येथून जवळ आहेत. 

या दोन्ही ठिकाणांपासून जवळच पाहण्यासारखी अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. राजमाची पॉईंट, टायगर्स लिप, वळवण धरण, ड्युक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेण्या, लोहगड, विसापूर ही त्यापैकी ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे. 

माथेरान:

रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ८०३ मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे. वाहनांना प्रवेश नसल्यामुळे माथेरानमध्ये चालत, घोड्यावरून किंवा डोलीतून भटकंती करावी लागते.  आणि खरोखरच निसर्गाशी मैत्री करण्यासाठी आणि प्रदूषणापासूनची मुक्ती अनुभवण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. नागमोडी रस्ते, लाल माती, टेकड्या, धबधबे, पठार, मोठेच्या मोठे गोल्फ कोर्स आणि नेरळ-माथेरान नॅरोगेज रेल्वे अशी येथील अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. येथे एकूण २५ निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. 

चिखलदरा:

महाराट्रातील अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वंतरांगेत ‘चिखलदरा’ हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटकांना नेहमी खुणावत असते. चिखलदरा या ठिकाणाला मनोरंजक इतिहास आहे. इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला पार महाभारतात जावे लागते. पाच पांडव वनवासात असताना त्यांनी काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता, असे म्हणतात. भीमाने कीचकाचा वध केला आणि येथील दरीत फेकून दिले. तेव्हा या भागाचे नाव किचकदरा आणि नंतर (अपभ्रंशाने) चिखलदरा असे झाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि गुगामल नॅशनल पार्क याच भागात आहे. गाविलगड व नर्नाळा किल्ला परिसरात आहेत. विविध प्राणी, जै‍विक वनस्पती व वनांनी हा प्रदेश समृद्ध आहे. हिरवळीचा गालिचा पांघरलेला हा प्रदेश मन मोहून घेतो. त्याचवेळी दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा, खोल दर्‍या श्वास रोखून धरायला लावतात.

चिखलदर्‍याच्या दक्षिणेला तीन किलोमीटरवर ‘बहामनी किल्ला’ आहे. किल्ला पाहण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. आत जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा वगैरे आहेत. इथली दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. याशिवाय इथले शक्कर तलाव, मछली तलाव, देवी तलाव, काला पाणी तलाव आणि मंकी पॉइंट अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. पंचबोल पॉइंट (युको पॉइंट) तर पर्यटकांना चक्राऊन टाकणारा आहे. चारही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरी आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यास पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो. भीमकुंड, आदिवासी वस्तु संग्रहालय, शक्कर तलाव, शिवमंदिर या प्रेक्षणीय ठिकाणांचा, तसेच येथील आदिवासी संस्कृतीचा, त्यांच्या विशिष्ट उत्सवांचा आनंद पर्यटक घेऊ शकतात. हे विदर्भातील दुर्मीळ गिरीस्थान आहे, याला ‘विदर्भाचे नंदनवन’ म्हणतात.

Must Read

चेहऱ्यावरील टॅन घालवण्यासाठी हे करून बघा

किरण परब

त्वचेसाठी फायदेशीर ठरतो आंबा; पिंपल्स दूर करण्यासोबतच होतात अनेक फायदे

किरण परब

१२ धड़े आचार्य चाणक्य नीतीच्या जीवनशैलीवर आधारित

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More